जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप   

व्यवहार ठप्प; सर्वत्र वाहतूक कोंडी

पुणे : सलग दुसर्‍या दिवशी शहर आणि परिसरात मेघगर्जना, वीजांचा कडकडाटात धुव्वाधार पाऊस झाला. सुमारे तासाभरापेक्षा अधिक काळ पडलेल्या पावसामुळे पुणेकरांची प्रचंड गैरसोय झाली. रस्त्यांना नाल्याचे रूप आले. बाजारपेठा ठप्प झाल्या, वाहने, पादचार्‍यांविना रस्ते रिकामे झाले. नागरिकांना आहे त्या ठिकाणी थांबावे लागले. वाहनांचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडी झाली. पाऊस आणि वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना पुणेकरांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली.
 
सकाळपासून उकाड्यात वाढ झाली होती. त्यानंतर दुपारी आकाशात ढग दाटून आले. सायंकाळी पाचच्या सुमाराला जोरदार पावसाला सुरूवात झाली. पावसाला सुरूवात झाल्यानंतर अवघ्या काळी वेळात रस्ते जलमय झाले. धडकी बसविणार्‍या वीजांच्या कडकडाटामुळे अनेकांनी घरातच थांबणे पसंद केले. मेघगर्जनेमुळे कार्यालयातून बाहेर पडणार्‍यांनी आहे त्या ठिकाणीच थांबण्याचा निर्णय घेतला. वाहत्या पाण्यातून रस्ता शोधणे कठीण होत होते त्यामुळे वाहन चालकांनी वाहन कडेला लावून पाऊस थांबण्याची वाट पाहिली. रात्री उशीरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. 
 
स्वारगेट, येरवडा, हडपसर, कर्वेनगर, वारजे, कोथरूड, प्रभात रस्ता, चांदणी चौक, धायरी, वडगाव, कात्रज, बालाजीनगर, मार्केटयार्ड, शिवाजीनगर, डेक्कन, पाषाण, एनडीए, सिंहगड रस्ता, मगरपट्टा, विमाननगर, लोहगाव परिसरासह मध्य वस्तीतील बहुतांश पेठांमध्ये जोरदार पाऊस पडला. कार्यालयीन सुट्टी झाल्यानंतर पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे अनेकांना आहे त्या ठिकाणी थांबून पाऊस कमी होण्याची प्रतिक्षा करावी लागली. तर जोरदार पावसामुळे तुळशीबाग, महात्मा फुले मंडई, बोहरीआळी, सराफी बाजार, कापड बाजारातील व्यवहार ठप्प झाले. जोरदार पावसामुळे रस्त्यांच्या कडेला थांबून विविध पदार्थ व खाद्यपदार्थांची विक्री करणार्‍यांची मात्र धावपळ झाली. साहित्याची आवराआवर करताना त्यांची दमछाक झाली. 
 
रस्त्यांवरून रात्री उशीरापर्यंत पाणी वाहत होते. तर सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहत्या पाण्यातून अंदाज घेत वाहन चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागली. पावसामुळे कार्यालयातून घराकडे निघालेल्या अनेकांना घरी पोहचण्यास उशीर झाला. बोपदेव आणि दिवेघाटात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. उपनगरातील रस्त्यांवरही पाणी साचले होते. 
 
शहर व परिसरात पडलेला पाऊस 
 
ठिकाण                 पाऊस 
शिवाजीनगर       ५५ मिमी
लोहगाव             ४५ मिमी
मगरपट्टा         ४०.५ मिमी
हडपसर            ३५ मिमी
एनडीए           १०.५ मिमी
 
२४ तासात कोसळली ३४ झाडे 
 
• शहर आणि परिसरात मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडला. जोरदार पावसामुळे मागील २४ तासात शहरात ३४ ठिकाणी झडे कोसळली. काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतूक कोंडी झाली, तर काही ठिकाणी वाहनांवर झाडे पडल्याच्या घटना घडल्या. रस्त्यांवर पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांनी केले. बर्‍याच ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्यामुळे तातकाळ कोसळलेले झाड बाजूला करण्यात आले. 
 
आकाशात ढगांची गर्दी
 
•  पुणे शहर आणि परिसरात आकाशात ढगांची गर्दी झाली होती. त्यामुळे कमी वेळेत अधिक पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. तसेच रात्रभर पाऊस पडणार असल्याने सर्तक राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. पावसाला सुरूवात झाल्यानंतर घराबाहेर पडणे टाळावे, अशी सूचनाही हवामान विभागाने केली होती. ढगांच्या गर्दीमुळेच शहरात काल सायंकाळी मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडला. पुढील तीन दिवस शहरात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

Related Articles